२००५ वर्षी पप्पांच्या दोन्ही किडनी निकामी असल्याचे निदान झाले आणि तेंव्हापासुन डायलिसीसचे दुष्टचक्र त्यांच्या मागे लागले. तेंव्हापासुन आजपर्यंत अनेक गोष्टी आम्ही अनुभवल्या. काही चांगल्या, पण बहुतांश वाईटच. ह्या महागड्या आजारातुन खरोखरच सुटका नाही ही जाणिव झाली. कंपनीकडुन मिळणार्या इंन्शोरन्सच्या सुविधेने जगणे बरेच सुसह्य झाले. बहुतांश खर्च ह्यामुळे विभागला गेला परंतु तरी पोटाला चिमटा होताच.
तिन वर्षांपुर्वी पुना हॉस्पीटलमध्ये किडनी ट्रान्सप्लॅन्ट्साठी नाव नोंदवले. पण अवयव दान अजुनही आपल्या देशात रुजलेले नाही ह्याची प्रकर्षाने जाणिव झाली.
परंतु २० तारखेला अचानक फोन आला की एक किडनी उपलब्ध आहे, ट्रान्सप्लॅन्टसाठी तयार आहात का? लगेच निर्णय घेणे गरजेचे होते. माझे प्रामाणिक मत "नको" असेच होते. वडीलांचे वय ६० आहे आणि ह्या वयात ऑपरेशन मानवले नाही, किडनी सुट झाली नाही, नंतर इन्स्फेक्शन्सचा त्रास उद्भवला तर सारखे प्रश्न होते. परंतु आई-बाबा मात्र पुर्णपणे तयार होते आणि म्हणुनच आम्ही होकार कळवला.
लगोलग त्याच रात्री दवाखान्यात भरती केले आणि आवश्यक चाचण्या पुर्ण करुन घेतल्या. दुसर्या दिवशी सकाळी किडनी मॅच होत असल्याचे कळवण्यात आले आणि ९.३० ते १२.३० वेळाचे ऑपरेशन पार पाडुन शेवटी किडनी ट्रान्सप्लॅन्ट करण्यात आले.
वडील सध्या आय.सी.यु. मध्येच आहेत आणि अजुन किमान ८ दिवस आय.सी.यु आणि नंतर १५ दिवस वार्डमध्ये मुक्काम असणार आहे. तब्येत चांगली आहे आणि सुधारते आहे. पण मला वाटते खरी लढाई नंतरचे २-३ महीन्यांची आहे.
आशा करतो की सर्व काही सुरळीत पार पडेल आणि त्यांना पहिल्यासारखे आयुष्य जगता येईल
~ अनिकेत
Recent Comments